साने गुरुजी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले एक सत्यनिष्ठ, सेवाभावी, प्रेमळ, श्रद्धाळू असे व्यक्तित्व. गुरुजी म्हणजे एक भावनिक साहित्यकार, संपूर्ण आयुष्य देशसेवेस समर्पित करणारे त्यागमूर्ती आणि समाजवादी विचारांचे एक बहुआयामी व्यक्तित्व. आजच्या बदलत्या युगात भारतीय संस्कृतीची मूल्ये समाजात जपणे अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या ग्लोबल वातावरणात माणूस वेगाने प्रगती करत आहे. परंतु त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मानवी मूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुजींनी मांडलेली नीतिमूल्ये पुन्हा नवीन पिढीपुढे येणे आवश्यक आहे.
मराठवाड्याचा इतिहास जाणणाऱ्याला स्वामी रामानंद तीर्थ यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. निजामाच्या सरंजामशाही राजवटीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान स्वतंत्र झाले. त्यानंतर राज्याचे त्रिभाजन होऊन तेलगू भाषिक भूभाग आंध्र प्रदेशात, कानडी भाषिक प्रांत कर्नाटकात आणि मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि राज्याच्या त्रिभाजनात अग्रगण्य नेते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे.
‘संयुक्त महाराष्ट्रा’च्या निर्मितीत काही महत्वाच्या नेत्यांचा सहभाग होता, त्यात एसएम जोशी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी घोषित करण्यात आली. परंतु यासाठी मराठी जनतेने उभारलेला लढा मराठी माणूस विसरू शकणार नाही. ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’चे सरचिटणीस या नात्याने एसएम जोशी यांनी लढ्याचे प्रभावी नेतृत्व केले आणि केंद्रीय नेत्यांना संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यास भाग पाडले. १९७५ ते १९७७ या काळात देशाला आणीबाणीच्या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरे जावे लागले. आणीबाणी उठल्यानंतर विरोधी पक्षांनी ‘जनता पक्षा’ची स्थापना करून देशात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याचा कौतुकास्पद प्रयोग केला. जनता दलाच्या निर्मितीत जयप्रकाश नारायण यांचे निकटचे सहकारी या नात्याने एसएम जोशी यांनी मोलाची कामगिरी बजावली.
ग्रामविकासाचे प्रणेते, भारतरत्न नानाजी देशमुख हे महाराष्ट्रात जन्मले आणि उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश ही त्यांची कर्मभूमी ठरली. बालवयातच संघाच्या कार्यात सहभागी झाले. नंतर जनसंघ, जनता दल व भाजपच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली. साठाव्या वर्षी राजकारणातून निवृत्त होऊन त्यांनी गोंडा, बीड व चित्रकूट हे समाजउभारणीचे प्रकल्प उभारले. त्याग, सेवाभाव, देशभक्ती, निस्वार्थपणा यांचा मिलाफ असलेले त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. जातपात, भेदभाव न मानता समाजसुधारणेची आस व नवनिर्मितीची उर्मी घेऊन ते अखेरपर्यंत कर्मयोगी राहिले. नानाजी म्हणजेच चैतन्याचा झरा!
हैदराबाद मुक्तिसंग्राम, मराठवाड्याचे संयुक्त महाराष्ट्रात विलीनीकरण आणि त्यानंतरच्या मराठवाड्याच्या विकासाच्या इतिहासात गोविंदभाई श्रॉफ यांचे नाव आदराने घेतले जाते. तरुण वयातच त्यांनी हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली आणि लढ्याच्या अंतिम टप्प्यात निर्णायक भूमिका बजावली. हैदराबाद राज्याच्या त्रिभाजनात आणि मराठवाड्याच्या महाराष्ट्रात विलीनीकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. स्वातंत्र्यानंतर राजकारणापासून दूर राहून त्यांनी आपले पंचावन्न वर्षांचे आयुष्य मराठवाड्याच्या विकासासाठी समर्पित केले. आपल्या समाजवादी विचारसरणीमुळे त्यांनी समाजावर वेगळी छाप उमटवली.