भारतीय चित्रसृष्टीच्या विकासात महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर यांनी सुरू केलेले हे कार्य समर्थपणे पुढे नेणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये ‘व्ही शांताराम’ यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून समाजप्रबोधन साधणे हीदेखील आपली नैतिक जबाबदारी आहे’ हा विचार शांतारामांनी चित्रसृष्टीला दिला. ‘अद्ययावत तंत्रांचा उपयोग’ आणि ‘आपली प्रतीकात्मक दिग्दर्शन शैली’ याने व्ही शांताराम यांनी भारतीय चित्रसृष्टीवर आपला ठसा उमटवला. चित्रसृष्टीतील आपल्या कारकिर्दीत त्यांनी ७० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली, ४४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले, तर २१ चित्रपटांत अभिनय केला.
दुर्गा खोटे (१९०५–१९९१) यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले तेव्हा प्रतिष्ठित कुटुंबातील स्त्रिया चित्रपटात काम करीत नसत. तत्कालीन सामाजिक बंधने मोडून, त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश करून कर्तबगार स्त्रियांसाठी एक पायंडा पाडला. त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांत काम करून सहा दशके गाजवली. 'अयोध्येचा राजा' पासून ते 'मुघल-ए-आझम'पर्यंतचा त्यांचा प्रवास स्त्रीशक्ती आणि कलात्मकतेचे प्रतीक ठरला. 'पायाची दासी', 'बॉबी', 'आनंद' अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी माहितीपट आणि दूरदर्शन निर्मितीतही यश मिळवले. १९८३ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.