महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रांत आबासाहेब गरवारे यांचे नाव आदराने घेतले जाते. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भालचंद्र दिगंबर गरवारे यांनी आपल्या अथक परिश्रमाने, जिद्दीने आणि दूरदृष्टीने उद्योग जगतात एक अतुलनीय यश संपादन केले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या, आणि कोणतीही गोष्ट मनोभावे आणि पूर्ण समर्पणाने करण्याची वृत्ती बाळगलेल्या आबासाहेबांच्या जीवनाची ही गाथा निश्चितच प्रेरणादायी आहे.
इरावती कर्वे या विसाव्या शतकातील भारतातील एक अग्रगण्य समाजशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ होत्या. त्यांचे कार्य भारतीय समाज, संस्कृती, कुटुंबव्यवस्था व नातेसंबंध आणि मानवी विविधता समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी केवळ शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातच नव्हे, तर तत्कालीन सामाजिक आणि राजकीय विचारांवरही आपला ठसा उमटवला, संशोधनात्मक लेखनाशिवाय ललित लेखनदेखील केले. ‘युगांत’ या त्यांच्या महाभारतावरील लेखांच्या संग्रहाला १९६८ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.