महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासात अमूल्य योगदान असणाऱ्या व्यक्तींचे समग्र चरित्रदर्शन
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देशभर स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. सामाजिक आणि राजकीय जागृतीचा तो काळ होता. अण्णासाहेब कर्वे, गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरु केलेल्या सामाजिक जागृतीच्या चळवळीला लोकमान्य टिळकांनी संपूर्ण स्वराज्याच्या लढ्याचे रूप दिले. शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांनी ती परंपरा पुढे नेली. अखेर १९४७ मध्ये याचे पर्यावसान स्वतंत्र भारताच्या निर्मितीत झाले. महाराष्ट्रातील या नेत्यांनी आपला ठसा राष्ट्र पातळीवर उमटवला.
स्वातंत्र्योत्तर काळात भाषावार प्रांतरचना झाली. त्यातून १९६० साली आज आपल्याला दिसत असलेल्या भौगोलिक सीमांचा महाराष्ट्र निर्माण झाला. ब्रिटिश अधिपत्याखाली असलेल्या मुंबई प्रांतातील मराठी भाषिक; पश्चिम महाराष्ट्र, पूर्वाश्रमीच्या निजाम संस्थानातील मराठवाडा, खानदेश आणि मध्य प्रांतातील मराठी भाषिक विदर्भ अशा भिन्न सांस्कृतिक चालीरीतींचा परंतु माय मराठी भाषेच्या धाग्याने एकसंध बांधलेला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला.
विविधतेने नटलेल्या या महाराष्ट्राला एकजीव करण्याचे काम विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले. १९०० ते १९३० या तीस वर्षात जन्माला आलेल्या अनेक लोकोत्तर नेत्यांचा आणि व्यक्तींचा हा कार्यकाळ. आज आपल्यासमोर दिसणारे महाराष्ट्राचे सांस्कृतिक चित्र तयार करण्यात या व्यक्तींचे अमूल्य योगदान आहे. राजकीय, सामाजिक, कला, साहित्य, क्रीडा अशा अनेक विषयात या व्यक्तींनी मोलाची कामगिरी बजावली. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीचा घालून दिलेला पायंडा आणि त्याचा प्रभावी प्रसार करणारे यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशींचा समाजवाद, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, लता मंगेशकर इत्यादींनी साहित्य आणि कला क्षेत्रात दिलेले योगदान, क्रिकेट, कुस्ती आणि इतर क्रीडा क्षेत्रात मराठी खेळाडूंनी केलेले विक्रम यातूनच महाराष्ट्राची अस्मिता निर्माण झाली.
१९०० ते १९३० या काळात महाराष्ट्रात जन्माला आलेल्या या असामान्य व्यक्तींचे कार्य आजच्या पिढीसमोर सतत राहणे आवश्यक आहे. यातूनच महाराष्ट्रातील सामान्य जनतेची अस्मिता तेवत राहील. या उद्देशाने व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशनने एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. इंटरनेटच्या या बदलत्या युगात या असामान्य शताब्दी-वीरांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश पाडणारी सविस्तर संकेतस्थळे तयार करण्याचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला आहे. ३०० हून अधिक अशा असामान्य वक्तींची यादी करण्यात आली आहे. यावर काम सुरु देखील झाले आहे.